मेलबर्न : ‘भारत दौऱ्यात खेळपट्टी पूर्णपणे फिरकीस अनुकूल ठरणारी मिळाली, तर यजमानांचे पारडे जड राहील; पण जर खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली, तर ऑस्ट्रेलिया मालिका जिंकू शकेल. त्यामुळे खेळपट्टी चांगली मिळाली, तर ऑस्ट्रेलियाकडे ऐतिहासिक विजयाची संधी असेल,’ असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक इयान हिली यांनी व्यक्त केले.
९ फेब्रुवारीपासून नागपूर येथून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेआधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी शाब्दिक चकमकीला सुरुवात केली असून आता हिली यांनीही यामध्ये भर टाकली आहे. हिली म्हणाले की, ‘सुरुवातीला फलंदाजांसाठी आणि खेळ जसजसा पुढे रंगेल, तशी फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरणारी खेळपट्टी मिळाल्यास ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा उंचावतील. पहिल्या कसोटी सामन्यासाठी मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन यांच्याविषयी मला चिंता आहे. जर गेल्या वेळच्या प्रमाणे खेळपट्ट्या मिळाल्या, तर भारताचे पारडे जड राहील. त्यावेळी, पहिल्याच दिवसापासून चेंडूने मोठी उसळी घेण्यास सुरुवात केली होती. चेंडू थांबूनही येत होते. माझ्या मते अशा परिस्थितीत आमच्या तुलनेत भारतीय संघ उजवा आहे.’
हिली यांनी युवा खेळाडूंना मोलाचा सल्लाही दिला. ते म्हणाले की, ‘युवा खेळाडूंनी यजमान संघाच्या दडपणापासून स्वत:ला वाचविण्याऐवजी त्या दडपणाचा खंबीरपणे सामना करावा. भारतात १० बळी घेण्यासाठी तुम्हाला दहाच संधी मिळतील; पण ऑस्ट्रेलियात उसळणारे चेंडू आणि वेगाच्या जोरावर तुम्ही १३ संधी निर्माण करू शकता. त्यामुळे क्षेत्ररक्षणादरम्यान ऑस्ट्रेलियात केलेली चूक एखादवेळेस चालून जाईल; पण भारतात हीच चूक महागडी ठरू शकते.’