India vs Australia Test: नववर्ष सुरू होताच आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा फेब्रुवारी महिन्यात रंगणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) कसोटी मालिकेकडे लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी भारतात येण्यापूर्वीच आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भारतीय संघाने बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका सहज जिंकली. त्यामुळे भारतीय संघाची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त झाली आहे. पण तरीदेखील ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरोधात भारताला चार कसोटी सामने खेळून जिंकायचे आहेत. या दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने मात्र भारतात येऊन, टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी मास्टरप्लॅन सज्ज केला असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे ऑस्ट्रेलियाचा 'मास्टरप्लॅन'
परदेशी आल्यावर दौऱ्यांपूर्वी सराव सामने न खेळण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती असणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतही हीच रणनीती आखली असून ती रणनीती प्रभावी ठरेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेपूर्वी सराव सामना खेळण्याची शक्यता नाही. ९ फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या एक आठवड्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येईल. मॅकडोनाल्ड म्हणाले की, भारतात जाऊन सराव सामने खेळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे यापेक्षा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ताजे राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी अशी योजना आखली आहे.
१९ वर्षांनंतर प्रथमच भारतात मालिका जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य आहे. 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'च्या वृत्तानुसार, मॅकडोनाल्ड म्हणाले की, आम्ही परदेश दौऱ्यांवर गेल्या काही मालिकांमध्ये सराव सामने न खेळण्याचे धोरण स्वीकारले आहे. आमच्या संघाला अशा सामन्यांच्या सरावाची गरज नाही, असे आम्हाला वाटते. पहिल्या कसोटी सामन्याच्या एक आठवडा आधी आम्ही भारतात जाणार आहोत, आम्हाला तयारीसाठी जास्त वेळ घालवायचा नाहीये. गेल्या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यात अवलंबलेली अशीच रणनीती तीन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकताना प्रभावी ठरली.
दरम्यान, २००४-०५ मध्ये एडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारतात शेवटची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. २०१७ मध्ये पुण्यातील पहिली कसोटी जिंकून ते मालिका जिंकण्याच्या स्थितीत होते, पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत मालिका २-१ ने जिंकली. त्यामुळे यंदाची मालिकाही नेहमीप्रमाणेच रोमांचक होणार हे नक्की आहे.