नवी दिल्ली : अंडर-19 ट्वेंटी-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सलग तीन विजयानंतर भारतीय संघाला सुपर-6 च्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 7 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचा डाव अवघ्या 87 धावांवर गारद झाला. यानंतर कांगारू संघाने 13.5 षटकांत 3 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले.
दरम्यान, शनिवारी भारतीय संघाला सुपर-6 च्या पहिल्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाची फलंदाजी खराब केली. गट सामन्यांमध्ये गोलंदाजांवर हल्लाबोल करणाऱ्या कर्णधार शेफाली वर्माला केवळ 8 धावा करता आल्या. सलामीवीर श्वेता सेहरावतने 21 तर हर्षिता बसू आणि तीतास साधूने 14-14 धावा केल्या. 8 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. संपूर्ण संघ 18.5 षटकांत 87 धावांत सर्वबाद झाला.
ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून मिळवला विजय 88 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 28 धावांवर पहिला धक्का बसला. केट पेले 28 धावा करून बाद झाली. अर्चना देवीने सिएना जिंजरला बाद केले आणि त्यानंतर एला हेवर्डला सोनम यादवने बाद केले. भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण, ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर मोरे आणि एमी स्मिथने डाव सांभाळला आणि एकही विकेट न गमावता सामना अखेरपर्यंत नेत शानदार विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"