दुबई - ‘भारताविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया ३-१ अशी जिंकेल. भारत केवळ एकच सामना जिंकू शकेल, कारण मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत कसोटीत २० बळी घेणे पाहुण्या संघासाठी सर्वांत अवघड आव्हान असेल’, असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने केले आहे. मंगळवारी सुनील गावसकर यांनी देखील भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४-० ने जिंकणे शक्यच नाही, असे धक्कादायी भाकीत वर्तविले होते.
ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य बॉर्डर-गावसकर चषक विजयाचा दुष्काळ संपविणे हेच असेल. भारताने २०१४-१५ पासून सर्व चारही मालिका जिंकल्या. त्यात ऑस्ट्रेलियाच्या भूमीत झालेल्या २०१८-१९ आणि २०२०-२१ मालिकेचाही समावेश आहे. भारताला आपल्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ०-३ असा नामुष्कीचा पराभव पत्करावा लागला.
‘आयसीसी रिव्ह्यू शो’मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयाबाबत पाँटिंग म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता आधीच्या तुलनेत बळावली. शमी दुखापतींमुळे मागच्या नोव्हेंबरपासून स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा व पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेला हर्षित राणा या वेगवान गोलंदाजांमध्ये उणीव जाणवते. त्यामुळे वेगवान गोलंदाजीमध्ये २० गडी बाद करण्याची क्षमता नसल्याचे माझे मत आहे.’
भारत कमजोर नाही पण...= ऑस्ट्रेलिया संघ अधिक स्थिर असल्याची प्रशंसा करीत पाँटिंग म्हणाला, ‘२२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत असलेल्या मालिकेत भारत पूर्णपणे कमकुवत वाटत नाही. - ‘माझ्या मते भारत एक सामना जिंकेल. भारताच्या तुलनेत आमचा संघ अधिक स्थिर आणि अनुभवी वाटतो. त्यामुळे माझे मत ३-१ असे आहे,’ असे पाँटिंगने म्हटले. - शिवाय, ‘या मालिकेत स्टीव्ह स्मिथ किंवा ऋषभ पंतपैकी एक जण सर्वाधिक धावा काढू शकतो. स्मिथ सलामीऐवजी चौथ्या स्थानी फलंदाजी करणार असून स्वत:ला सिद्ध करण्याची त्याला संधी असेल,’ असेही पाँटिंग म्हणाला.