David Warner After Retirement: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अलीकडेच वन डे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तो सध्या त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेला तिसरा सामना वॉर्नरच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना आहे. मात्र, वॉर्नर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेत दिसणार आहे... पण एका नव्या भूमिकेत.
माहितीनुसार, वॉर्नर आगामी काळात कसोटी सामन्यांमध्ये समालोचन करणार आहे. समालोचक म्हणून डेव्हिड वॉर्नरची पहिली मालिका भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही असू शकते. खरं तर टीम इंडियाला या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नर समालोचकाची भूमिका बजावू शकतो.
वॉर्नर नव्या भूमिकेत... दरम्यान, नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करणारा वॉर्नर लीग क्रिकेटमध्ये दिसण्याची शक्यता आहे. कारण त्याने केवळ कसोटी आणि वन डे क्रिकेटला रामराम केले आहे. डेव्हिड वॉर्नरच्या या नव्या भूमिकेबद्दल चाहते उत्सुक आहेत. वॉर्नर क्रिकेटच्या मैदानावर आपल्या अनोख्या कृत्यांसह चाहत्यांचे खूप मनोरंजन करत असतो. मैदानाबाहेरही तो सोशल मीडियावर आपल्या मजेशीर व्हिडीओंनी चाहत्यांच्या संपर्कात असतो.
डेव्हिड वॉर्नरची वन डे कारकिर्द डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या वन डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिली. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ३३ अर्धशतके झाली आहेत. त्याला वन डे कारकिर्दीत ७३३ चौकार आणि १३० षटकार मारण्यात यश आले.