सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद आरोन फिंचकडे कायम ठेवण्यात आले आहे. या संघात अनुभवी पीटर सिडल, नॅथन लायन आणि उस्मान ख्वाजा यांचे पुनरागमन झाले आहे. पण मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत तब्बल नऊ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूचे पुनरागमन झाले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 12 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे. कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडनचे एकदिवसीय संघात तब्बल नऊ वर्षांनी पुनरागमन झाले आहे. यापूर्वी सिडन 2010 साली श्रीलंकाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याच्या नावावर एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही. सिडल हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघामध्ये होता. पण भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सिडलला एकदाही अंतिम अकरा सदस्यीय संघात स्थान देण्यात आले नव्हते.