नवी दिल्ली : आघाडीची फलंदाजी चिंतेचा विषय असली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत भारतच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. नागपूर कसोटीप्रमाणे हा सामनादेखील तीन दिवसांत संपणार आणि यजमान संघ मोठ्या फरकाने विजयी होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा वगळता आघाडीचे सर्वच फलंदाज अपयशी ठरले होते. रोहितने १२० धावा केल्या तर विराट कोहली, लोकेश राहुल आणि पुजारा हे आल्या पावली परतले. आता विराट लियोन आणि मर्फी यांचा फिरकी मारा कसा खेळून काढतो हे पाहावे लागेल. दुसरीकडे, राहुलमुळे फॉर्ममध्ये असलेला शुभमन गिल याला राखीव बाकावर बसावे लागत आहे. राहुलला ४५ कसोटी सामन्यांत संधी मिळूनही त्याची सरासरी ३४ हून कमी आहे. अखेरच्या दोन कसोटींसाठी संंघाची घोषणा होण्याआधी कर्नाटकचा ३० वर्षांचा राहुल अपयशी ठरल्यास संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावाच लागेल.
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी नागपूर कसोटीत वर्चस्व गाजविले होते. येथे संथ आणि वळण घेणारी खेळपट्टी असेलच असे नाही. तरीही ऑस्ट्रेलियाने फलंदाजीत हाराकिरी केल्यास हा सामनादेखील पाच दिवस चालू शकणार नाही. खेळपट्टीवरील ओलावा नाहीसा झाला तर ती निर्जीव होईल, हे नक्की. मुख्य कोच राहुल द्रविड यांनी कबुली देत सांगितले की, अलीकडे जडेजा, पंत आणि श्रेयस अय्यर या त्रिकुटाने अनेकदा संकटाबाहेर काढले. नागपूर सामन्यातही जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजविले होते. कोटलाची खेळपट्टी जामठ्याच्या तुलनेत थोडी मंद असू शकते. अशावेळी रोहितप्रमाणे संयमी, बचावात्मक आणि आक्रमक खेळी करण्याची हिंमत अन्य खेळाडूंना दाखवावी लागेल.
या मैदानावरील एका टोकाची सीमारेषा लहान (६० मीटर) असल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा नाथन लियॉनकडून गोलंदाजी करून घेताना सावध असेल. श्रेयसने पाठीच्या दुखण्यावर मात करीत पुनरागमन केल्याने त्याचा अंतिम एकादशसाठी विचार होऊ शकतो. पण, ३० दिवसांपासून कसोटी न खेळलेल्या अय्यरला थेट संघात स्थान देणे जोखमेचे ठरणार नाही ना, याविषयी विचार करावा लागेल. त्याला खेळविल्यास सूर्याला बाहेर ठेवले जाईल. डेव्हिड वॉर्नरची खराब फलंदाजी ही ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरली. त्याला आणखी एक संधी दिली जाईल? संघात तीन फिरकी गोलंदाज खेळविले जातील? या दोन प्रश्नांची उत्तरे उद्याच मिळू शकतील. मिचेल स्टार्क फिट झाल्यास तो स्कॉट बोलॅन्डचे स्थान घेईल.