ind vs aus border gavaskar trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस महत्त्वाची मालिका होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. या मालिकेबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंगने एक मोठा दावा केला. खरे तर मागील दोन मालिकांमध्ये भारतीय संघाने विजय संपादन केला होता. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलिया भारताला वरचढ ठरेल असा विश्वास पाँटिंगने व्यक्त केला. ind vs aus ही पाच सामन्यांची कसोटी मालिका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे.
भारतीय संघाचा विजयरथ रोखण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियन संघासमोर असेल. २०१८-१९ मध्ये टीम इंडियाने कांगारूंच्या घरात जाऊन त्यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यावेळी टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. पण, अशा कठीण परिस्थितही भारताने विजय साकारला. त्यानंतर २०२०-२१ मध्ये देखील टीम इंडियाने कांगारूंचा पराभव केला होता. मात्र, यंदा ऑस्ट्रेलिया पराभवाचा वचपा काढेल, असे भाकीत पाँटिगने वर्तवले आहे. तो आयसीसीशी बोलत होता.
रिकी पाँटिंग म्हणाला की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका जोरदार होईल यात शंका नाही. मला वाटते की, ऑस्ट्रेलियाला भारतासमोर स्वतःला सिद्ध करावे लागेल. कारण गेल्या दोन मालिकांमध्ये फक्त टीम इंडिया जिंकत आली आहे. यावेळी पाच कसोटी सामने होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून फक्त चार सामन्यांची मालिका खेळवली जात होती मात्र यावेळी पाच सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. जास्त सामने अनिर्णित संपतील असे मला वाटत नाही. मी निश्चितपणे ऑस्ट्रेलियाला विजयाचा दावेदार मानत आहे. मी ऑस्ट्रेलियाविरोधात कधीच भाष्य करू शकत नाही. एक किंवा दोन सामने अनिर्णित राहतील आणि खराब हवामानाचाही काही सामन्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मला वाटते की, ३-१ ने ऑस्ट्रेलिया सहज ही मालिका आपल्या नावावर करेल.