भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी आपल्या कसोटी संघाची घोषणा केली. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला. पण, पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाडला वगळल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला. चांगली आकडेवारी असतानादेखील मराठमोळ्या खेळाडूला संघात स्थान मिळाले. याउलट खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या शुबमन गिलला संधी मिळाल्याने बीसीसीआय चाहत्यांच्या निशाण्यावर आली. आता भारताचे माजी खेळाडू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी ऋतुराजसाठी बॅटिंग करताना तिखट शब्दांत बीसीसीआयवर हल्ला चढवला.
"मला बीसीसीआयचे काहीच कळत नाही... मयंक यादव गोलंदाजी करू शकतो असे ते सांगत असतात आणि आता तोदेखील शिवम दुबे आणि रियान परागसारखा तंदुरुस्त नसल्याचे सांगितले जात आहे. ऋतुराजकडे पाहा, मला काहीच समजत नाही. त्याने आणखी काय करायला हवे? त्याने शतक झळकावले, मग त्यांनी त्याला ट्वेंटी-२० संघात घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने शतके झळकावली. पण तरीदेखील त्याला संधी मिळत नाही. ऋतुराजने सातत्याने धावा करुनही अशी परिस्थिती आहे. त्याने आता नक्की कुठे जायला हवे", असे कृष्णमाचारी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले. ते युट्यूब चॅनलवर बोलत होते.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, अवेश खान, यश दयाल
दरम्यान, आगामी काळात भारताचा अ संघात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्ध मालिका खेळेल. टीम इंडिया ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात असेल. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात ३१ ऑक्टोबरपासून दोन प्रथम श्रेणी (चार दिवसीय) सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन सामन्यांनंतर टीम इंडिया आपल्या वरिष्ठ संघाविरुद्ध एक सामना खेळेल.
भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन, अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन.