नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. कांगारूचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असून इथे 4 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मात्र, भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. खरं तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत ग्रीनचा संघात समावेश केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असल्यामुळे दोन्ही संघासाठी महत्त्वाची असणार आहे. कांगारूचा संघ सध्या चॅम्पियनशिप टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर स्थित आहे.
भारताविरूद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली होती. त्याच्या बोटात फ्रॅक्चर आहे. सामन्यादरम्यान त्रास होत असतानाही त्याने दुसऱ्या डावात नाबाद 51 धावांची खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना देखील जिंकला. दुखापतीमुळे ग्रीनवर आता शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे तो भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. यावरही ग्रीनने भाष्य केले आहे.
"IPL साठी तयार आहे" सेन स्पोर्ट्सडे डब्ल्यूएशी संवाद साधताना कॅमेरून ग्रीनने म्हटले, आयपीएलमध्ये त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीबद्दल जे काही समोर येत आहे ते योग्य नाही. मी खेळायला तयार आहे. अशा गोष्टी कुठून आल्या हे मला माहीत नाही. माहितीनुसार, 25 मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होऊ शकतो. 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल 2023साठी कॅमेरून ग्रीनला 17.5 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"