भारतीय संघ कसोटी मालिकेच्या तयारीला लागला आहे. १७ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे टेस्ट स्पेशालिस्ट खेळाडू सराव सामन्यात आपला दम दाखवत आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया A अशा सराव सामन्याला आजपासून सुरुवात झाली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी कोणाकडे सोपवावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. नियमानुसार उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) ही जबाबदारी पार पाडेल, परंतु रोहित शर्मानं ही धुरा सांभाळावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्या अनेकांना रहाणेनं आज सराव सामन्यातून उत्तर दिले.
रहाणेच्या नेतृत्वाखाळी खेळणाऱ्या भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांनी निराश केले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गिल ( ०) मिचेल नेसेरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पुढच्या षटकात जेम्स पॅटिन्सननं टीम इंडियाला धक्का देताना पृथ्वी शॉ ( ०) याला बाद केले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि हनुमा विहारी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडताना टीम इंडियाची गाडी रुळावर आणली. जॅक्सन बर्डनं विहारीला ( १५) पायचीत केले. त्यानंतर आलेल्या कर्णधार रहाणेनं चौथ्या विकेटसाठी पुजारासह टीम इंडियाचा डाव सावरला.
दोघांनी संयमी खेळ करताना ७६ धावांची भागीदारी केली. पुजारानं १४० चेंडूंत ५ चौकारासह ५४ धावा केल्या. पॅटिन्सननं त्याला बाद केले. वृद्धीमान सहा ( ०) याला ट्रॅव्हिस हेडनं,तर आर अश्विनला (५) पॅटिन्सननं बाद केले. संघ अडचणीत असताना रहाणे खेळपट्टीवर तग धरून उभा आहे. त्यानं कुलदीप यादवला सोबतीला घेताना संघाच्या धावा वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. चहापानार्पंत रहाणेनं १५५ चेंडूंत १ षटकार व ८ चौकाराच्या मदतीनं ६० धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या ६ बाद १५५ धावा झाल्या आहेत.