1983 world cup team | नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली.
दरम्यान, भारताच्या या विजयाचे सेलिब्रेशन 1983च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंनी तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या निवासस्थानी केले. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, मदन लाल आणि कीर्ती आझाद यांसारख्या दिग्गजांनी 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांच्या दिल्लीतील घरी जाऊन विजयाचे सेलिब्रेशन केले. खरं तर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 10 बळी घेतले, तर रविंचद्रन अश्विनला 6 बळी घेण्यात यश आले.
विश्वविजेत्या संघातील खेळाडूंनी केले सेलिब्रेशन
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी याबाबतचा फोटो शेअर करत म्हटले, "कर्णधार कपिलच्या घरी 83 मधील विश्वचषक संघातील दिल्लीच्या खेळाडूंशी भेटणे अविस्मरणीय आहे. दिल्ली कसोटीतील भारताचा विजय साजरा केला. रात्रीचे उत्तम जेवण, उत्तम संभाषणे आणि छान संध्याकाळ."
दरम्यान, कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत करून विश्वचषक जिंकला होता. कपिल देव (कर्णधार), सुनील गावस्कर, मदन लाल, मोहिंदर अमरनाथ, सय्यद किरमाणी (यष्टीरक्षक), यशपाल शर्मा, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील, क्रिस श्रीकांत आणि बलविंदर संधू, असा भारताचा तत्कालीन संघ होता. याशिवाय भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कपिल देव यांच्या घरातील फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. "भारताच्या घवघवीत यशानंतर माझ्या 83 मधील विश्वविजेत्या सहकार्यांसोबत राजधानीत कर्णधाराच्या घरी मस्त संध्याकाळचा आनंद लुटत आहे", असे शास्त्री यांनी फोटो शेअर करत म्हटले.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs AUS Celebration of India's Test win in Delhi at Kapil Dev's residence, see photos
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.