दुबईच्या मैदानात रंगलेल्या टीम इंडियाविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित ५० षटकेही खेळू शकला नाही. अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं ऑस्ट्रेलियाचा डाव खल्लास केला. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ आणि कॅरी यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाला फायनल गाठण्यासाठी आता २६५ धावा करायच्या आहेत. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्तीनं आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय हार्दिक पांड्या आणि अक्ष पटेल यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलामी जोडी स्वस्तात माघारी
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर ट्रॅविस हेड याने नवा पार्टनर कूपर कॉनोली याच्यासोबत ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाची सुरुवात केली. मोहम्मद शमीनं ९ चेंडूचा सामना करणाऱ्या कूपर कॉनोली याला शून्यावर माघारी धाडले. ट्रॅविस हेडही ३९ धावा करून वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर कर्णधा स्टीव्ह स्मिथनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने लाबुशेनेसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. जड्डूनं लाबुशेने याला २९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या जोश इंग्लिसलाही जड्डूनेच तंबूत धाडले. मग कॅरी अन् स्मिथ जोडी जमली.
मग स्मिथ-कॅरी जोडी जमली
आधी लाबुशेनेसोबत अर्धशतकी भागीदारी केल्यावर पाचव्या विकेटसाठी स्मिथ आणि कॅरी जोडीनं ५४ धावांची भागीदारी रचली. स्मिथ शतकी खेळीकडे वाटचाल करत असताना शमीनं ७३ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला. कॅरी शेवटपर्यंत आपला तोरा दाखवण्याच्या मूडमध्ये होता. पण श्रेयस अय्यरच्या जबरदस्त थ्रोवर त्याची खेळी ६१ धावांवर थांबली. अन् अखेरच्या टप्प्यात ठराविक अंतराने पडलेल्या विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३ चेंडू शिल्लक असतानाच २६४ धावांत ऑल आउट झाला.