Cheteshwar Pujara, IND vs AUS: टीम इंडियाने बांगलादेशला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला. सध्या भारताची घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका सुरु आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर ते ८ जानेवारी असा भारताचा ऑस्ट्रेलियात प्रदीर्घ दौरा आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने भारताविरूद्ध आधीच २ कसोटी जिंकल्या आहेत. या दोनही सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसले. घरचे मैदान असूनही भारताचे बडे फलंदाज अयशस्वी ठरले. गेल्या वेळच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चेतेश्वर पुजाराने भारताच्या मालिका विजयात मोठा वाटा उचलला होता. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताकडून अनुभवी चेतेश्वर पुजाराला संधी दिली जाईल असे वाटत होते. पण तसे घडले नाही. त्यानंतर पुजाराने केलेली भावनिक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. त्यात बॅकअप सलामीवीर म्हणून अभिमन्यू इश्वरनला संधी देण्यात आली. प्रसिध कृष्णाला संघात अचानक संधी मिळाली आहे. नीतीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या दोघांनाही कसोटी संघात पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आले. तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांना संघातून वगळण्यात आले. ऑस्ट्रेलियातील मैदाने पाहता तेथे वरच्या फळीतील सर्व फलंदाज हे अनुभवी असावेत असे चाहत्यांसह जाणकारांचे मत होते. त्यामुळे पुजाराचे संघात पुनरागमन होईल, असे बोलले जात होते. खुद्द पुजारालाही याची अपेक्षा होती. पण त्याचे नाव संघात नसल्याने तो काहीसा निराश झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करून भावना व्यक्त केल्या. "आजचे दु:ख, उद्याचा खंबीरपणा" असे कॅप्शन देत त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो फिटनेसवर कशी मेहनत घेतोय ही दिसून आले. त्याच्या या व्हिडीओ पोस्टवर अनेकांनी त्याच्या बाजूने कमेंट केल्या.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारताचा कसोटी संघ-रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर
विराटबद्दल माजी क्रिकेटरचा ऑस्ट्रेलियाला इशारा
"विराट कोहली हा सध्या त्याच्या कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर उभा आहे जिथे त्याला फक्त संघासाठी खेळायचं आहे आणि भारताला सामने जिंकवून द्यायचे आहेत. विराटच्या मनात असलेला असा विचार हा प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक आहे. कारण विराट निर्भिडपणे मैदानात उतरेल आणि मनसोक्त फटकेबाजी करेल. खेळताना विराटचे लक्ष वैयक्तिक धावसंख्या किंवा कुठल्याही रेकॉर्डवर नसेल. त्यामुळे त्याला कसलीही भीती नसेल. अशा वेळी मोठी खेळी आपोआपच शक्य होते," असा इशारा माजी क्रिकेटर माइक हेसन याने दिला.