India vs Australia, 4th Test Day 5 : शुबमन गिलसोबतच्या शतकी भागीदारीनंतर चेतेश्वर पुजारानं चौथ्या विकेटसाठी रिषभ पंतसोबत टीम इंडियाची खिंड लढवली होती. पण, नव्या चेंडूनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. २० षटकांत १०० धावांची गरज असताना पुजारा पायचीत होऊन माघारी परतला. पॅट कमिन्सनं त्याला बाद केले. पण, पुजारानं जाता जाता सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
३२८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ७) माघारी परतल्यानंतर शुबमन गिल ( ९१) व चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाची गाडी रुळावर आणली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या गिलला माघारी जाताना भारतीयांनी हळहळ व्यक्त केली. इतकी सुरेख फटकेबाजी करणाऱ्या गिलचे शतक व्हायला पाहिजे होते, असे सर्वांना मनोमन वाटत होते. गिल १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावांवर बाद झाला. त्यानं पॅट कमिन्सच्या एका षटकात २० धावा चोपून काढल्या.
ऑसी गोलंदाजांचा वेगवान चेंडू शरिरावर झेलूनही पुजारा अभेद्य भींतीप्रमाणे उभा राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी करताना टीम इंडियाच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभ पंतला बढती देण्यात आली, पण त्यानेही नंतर सामना अनिर्णित राखण्याच्या दृष्टीनेच खेळ केला. पुजारानं चौथ्या विकेटसाठी पंतसह अर्धशतकी भागीदारी केली. पुजारानं कसोटीतील सर्वात संथ अर्धशतक ( १९६ चेंडू) पूर्ण केले. ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात सर्वाधिक ६ वेळा २००+ चेंडूंचा सामना करण्याचा विक्रमही त्यानं नावावर केला. विराट कोहली, सुनील गावस्कर यांनी प्रत्येकी पाच वेळा २००+ चेंडूंचा सामना केला होता.
नवीन चेंडू घेतल्यानंतर पॅट कमिन्सनं पहिल्याच षटकात पुजाराची विकेट घेतली. अम्पायर कॉलमुळे पुजाराला २११ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं ५६ धावांवर माघारी जावे लागले. पुजारानं DRS घेतला अन् अम्पायर कॉलनं त्याचा घात केला. 1976 साली अंशुमन गायकवाड आणि मोहिंदर अमरनाथ यांनी अंगावर चेंडू झेलत अशी झुंजार खेळी केली होती. त्याची आठवण पुजारा ने चौथ्या कसोटी तल्या शेवटच्या खेळीने करून दिली