मेलबर्न : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे अनुभवी खेळाडू नाहीत. त्यामुळे भारताला यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे, असे म्हटले जात आहे. हिच भीती ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनलाही वाटत आहे आणि त्यामुळे स्मिथ व वॉर्नर यांच्यावरील बंदी उठवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. बेनक्रॉफ्टने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर भारताविरुद्धच्या दौऱ्यात खेळणार नाही, असे म्हटले जात होते. पण, ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने त्यांच्यावरील बंदी कमी व्हावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांच्यावरील बंदीच्या कारवाईबाबतचा निर्णय येत्या आठवड्यात घेतला जाईल. बेनक्रॉफ्ट याची शिक्षा 29 डिसेंबरला पूर्ण होत असून स्मिथ व वॉर्नर यांना 29 मार्च 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच रहावे लागणार आहे. मात्र, भारताविरुद्धची खडतर मालिका लक्षात घेता क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्यावरील बंदी मागे घेण्याच्या विचारात आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात बैठक होणार आहे.