IND vs AUS Test Series । नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. पाहुण्या संघाच्या निराशाजनक खेळीची भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने खिल्ली उडवली आहे. भारताने फिरकीपटूंना मदत करणारी खेळपट्टी तयार केली असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी केला होता. परंतु खेळपट्टीपेक्षा ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांना या खेळपट्टीवर खेळता आले नाही, असे हरभजन सिंगने म्हटले आहे.
दरम्यान, कसोटी मालिकेबद्दल बोलताना हरभजन सिंगने म्हटले, "ऑस्ट्रेलियाने रविचंद्रन अश्विनच्या डुप्लिकेटसोबत सराव केला. पण मला वाटते की ऑस्ट्रेलियन संघ स्वतःच डुप्लिकेट आहे. त्यांची मानसिकता अशी आहे की ते फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. त्यांनी एवढा गोंधळ निर्माण केला की पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच ते डाव गमावून बसले. या दौऱ्यासाठी त्यांनी कोणतीही तयारी केलेली दिसत नाही. त्यांची कामगिरी बघून मला वाटते की त्यांनी फक्त बाद होण्याचा सराव केला आहे."
भारत 4-0 ने मालिका जिंकेल - हरभजन सिंग
भारतीय संघाने 4 सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही 10 सामन्यांची मालिका असती तरी भारताने 10-0 ने विजय मिळवला असता असा दावा हरभजनने केला आहे. स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना माजी खेळाडूने म्हटले, "भारत 4-0 ने जिंकेल यात मला शंका नाही. जरी ती 10 सामन्यांची मालिका असली तरी, भारत ऑस्ट्रेलियाला 10-0 ने हरवेल कारण या ऑस्ट्रेलियन संघाकडे कोणतीही ताकद नाही."
BGT मालिकेत भारताचे वर्चस्व
भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून रोहित सेनेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या दोन सामन्यात कोहलीने काही खास कामगिरी केली नाही, तरीदेखील त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा आकडा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात 64 धावा केल्या.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs AUS Even If It Is A 10-Match Series, India Would Beat Australia 10-0 said that former cricketer Harbhajan Singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.