- १९ डिसेंबर २०२० - अॅडलेड कसोटीत टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर गडगडला
- १९ जानेवारी २०२१ - भारतानं गॅबा कसोटीत ऐतिहासिक विजयाची नोंद केली
India vs Australia, 4th Test Day 5 : या महिन्याभरातील टीम इंडियाचा प्रवास खरंच सर्वांना थक्क करणारा आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंवर विश्वास दाखवून अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) नेतृत्वकौशल्यानं टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारतानं गॅबा कसोटीत ३ विकेट्स राखून विजय मिळवताना चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अॅडलेड कसोटीतील '३६'च्या आकड्यानंतर टीम इंडिया हा चमत्कार करून दाखवले, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. पण, टीम इंडियानं ते करून दाखवलं. मायदेशात परतलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) टीम इंडियाच्या अविश्वसनीय विजयानंतर टीकाकारांचे कान टोचले.
अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली युवा ब्रिगेडनं कांगारूंना सळो की पळो करून सोडलं. भारतानं मालिकेत फक्त कमबॅक केले नाही, तर २-१ असा विजय मिळवून दिला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलने १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावा केल्या. पुजारानं २११ चेंडूंचा सामना करताना ५६ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभनं आक्रमक खेळ करताना १३८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ८९ धावा चोपल्या.
विराट कोहलीनं पोस्ट लिहिली की,'' What a Win!!!, अॅडलेड कसोटीनंतर आमच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, त्या प्रत्येकानं उभे राहा आणि लक्षात घ्या. अनुकरणीय कामगिरी, परंतु धैर्य आणि निर्धार या संपूर्ण प्रवासात सोबत होता. सर्व खेळाडूंचे व व्यवस्थापनाचे कौतुक. या ऐतिहासिक विजयाचा आनंद लुटा.''