IND vs AUS : भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. २०८ धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय गोलंदाजांना यशस्वी बचाव करता आला नाही. हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी दमदार फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान उभे केले होते. पण, मॅथ्यू वेडनं अंतिम षटकांत तुफान फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताकडून क्षेत्ररक्षणातही चूका झाल्या. लोकेश राहुल व अक्षर पटेल यांनी अनुक्रमे स्टीव्ह स्मिथ व कॅमेरून ग्रीन यांचा झेल सोडला. त्याचा खूप मोठा फटका भारताला बसला.
लोकेश ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर माघारी परतला. सूर्याने २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा केल्या. हार्दिक पांड्याचे वादळ नंतर घोंगावले. त्याने २०व्या षटकात सलग तीन षटकार खेचले आणि ३० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. भारताने ६ बाद २०८ धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीन ( ६१), स्टीव्ह स्मिथ ( ३५) व मॅथ्यू वेड ( ४५*) यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अक्षर पटेल ( ३-१७) वगळल्यास भुवनेश्वर कुमार ( ४-०-५२-०), हर्षल पटेल ( ४-०-४९-०), हार्दिक पांड्या ( २-०-२२-०), युजवेंद्र चहल ( ३.२-०-४२-१) व उमेश यादव ( २-०-२७-०) यांनी निराश केले.
भारताच्या क्षेत्ररक्षणातील चुकांकडे बोट दाखवताना पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट ( former Pakistan batter Salman Butt) याने खेळाडूंच्या फिटनेसवर टीका केली. तो म्हणाला,''टीम इंडियाच्या खेळाडूंची शारीरिक तंदुरूस्ती आदर्श नाही.. यावर अन्य कुणी बोलतंय की नाही, याची कल्पना नाही. विराट कोहली व हार्दिक पांड्या हे संघात दोनच तंदुरूस्त खेळाडू आहेत. त्यामुळे यांच्याकडून क्षेत्ररक्षणात चुका होत नाही. लोकेश राहुलने झेल सोडला. झेल पकडण्याचा त्याचा प्रयत्न आळशासारखा होता. अक्षरनेही मिड विकेटला झेल टाकला. असे झेल सोडून तुम्ही फलंदाजाला आणखी एक संधी देता.''
Rohit Sharma लाइव्ह मॅचमध्ये दिनेश कार्तिकवर खवळला, राहुल द्रविडने सर्व प्रकार पाहिला; Video Viral
''भारतीय क्रिकेटपटू हे जगात सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू आहेत. ते सर्वाधिक सामने खेळतात... पण, तरीही त्यांची शारीरिक तंदुरुस्ती का नाही? दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याशी फिटनेसच्या बाबतीत तुलना केल्यास भारतीय खेळाडू कुठेच दिसत नाहीत. काही आशियाई संघही याबाबतीत भारतापेक्षा सरस आहेत. भारताचे काही खेळाडू स्थूल आहेत आणि त्यांनी त्यांच्या तंदुरुस्तीवर काम करण्याची गरज आहे. विराट, रवींद्र जडेजा, हार्दिक हे खूप फिट आहेत, परंतु रोहित शर्मा, रिषभ पंत यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवे. हे तंदुरुस्त झाले तर ते अधिक आव्हानात्मक क्रिकेटपटू बनतील,''असेही बट म्हणाला.