Join us  

IND vs AUS : "भारताने खूप मेहनत घेतली पण...", पाकिस्तानी दिग्गज वसिम अक्रमकडून टीम इंडियाचं कौतुक

wasim akram on team india : भारतीय चाहत्यांची हृदयं तोडून कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 6:26 PM

Open in App

वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला आणि अवघ्या क्रिकेट विश्वात खळबळ माजली. भारतीय चाहत्यांची हृदयं तोडून कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. सलग दहा विजय मिळवून इथपर्यंत पोहचलेल्या भारताचा पराभव झाल्यानंतर यजमान संघाचे चाहते भावूक झाले. अनेकांना अश्रू अनावर झाले. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कठीण काळात आपल्या संघाच्या खेळीचे कौतुक करत असून भारतीय शिलेदारांना धीर देत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रमने देखील भारतीय संघाच्या खेळीला दाद दिली. 

भारतीय संघाचे कौतुक करताना अक्रमने सांगितले की, ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्हीही संघांनी इथपर्यंत पोहचण्यासाठी चांगली मेहनत घेतली. नाणेफेकिचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला पण मला वाटते की, टॉस फॅक्टर महत्त्वाचा नव्हता. सव्वा लाख प्रेक्षकांनी आपल्या घरच्या संघासाठी उपस्थिती दर्शवली होती. भारतीय संघाने खूप मेहनत घेतली, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुम्हाला समान संधी मिळायला हवी... तुम्ही विश्वचषक विजयासाठी पात्र होता पण ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत चांगला खेळ केला. तो पाकिस्तानातील एका टीव्ही शोमध्ये बोलत होता. 

भारताचा विजयरथ रोखून ऑस्ट्रेलिया चॅम्पियननाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले.  विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावसीम अक्रमपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ