India vs Australia Final: अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. रविवारी बेनोनी येथे दोन्ही संघ आमनेसामने असतील. उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलचे तिकिट मिळवले. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा विक्रमी पाचवेळा जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदाचा षटकार मारण्याची सुवर्णसंधी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना रविवारी बेनोनी येथे खेळवला जाणार आहे. हा विजेतेपदाचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजल्यापासून खेळवला जाईल. भारतीय चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. याशिवाय जिओ सिनेमावर लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. Jio Cinema वर चाहत्यांना हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये विजेतेपदाच्या सामन्याचा आनंद लुटता येईल.
दरम्यान, उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रोमहर्षक उपांत्य सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत बांगलादेश व्यतिरिक्त भारतीय संघाने आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड, नेपाळ आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने अत्यंत रोमांचक अशा दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा १ गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने प्रथम २००० मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून टीम इंडियाने ही स्पर्धा विक्रमी ५ वेळा जिंकली आहे. यंदाच्या हंगामात भारताने अपराजित राहून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.