icc odi world cup 2023 : यंदाच्या विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी कौतुकास्पद राहिली. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकल्यानंतर उपांत्य फेरीत देखील यजमान संघाने विजयरथ कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता किताबासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लढत होणार आहे. अनेक दिग्गजांसह क्रिकेट जाणकार भारत चॅम्पियन होईल असा विश्वास व्यक्त करत आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडियाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच २०२३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली असून आता त्यांना रोखणे कठीण असल्याचे गांगुलीने सांगितले.
खरं तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तेव्हा कांगारूंचा संघ भारताला वरचढ ठरला अन् टीम इंडियाला किताबापासून एक पाऊल दूर राहावे लागले. पण आता परिस्थिती वेगळी असून भारतीय संघाची लय पाहता तमाम भारतीयांचे स्वप्न पूर्ण होईल अशी सर्वांना आशा आहे. याबद्दल बोलताना गांगुलीने सांगितले की, फायनलसाठी मी दोन्हीही संघांना शुभेच्छा देतो... भारताने यंदाच्या पर्वात चांगले क्रिकेट खेळले आहे. भारताने असाच खेळ सुरू ठेवला तर त्यांना रोखणे कठीण आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक चांगला सामना होईल. गांगुली माध्यमांशी बोलत होता.
२० वर्षांचा बदला घेण्याचे टीम इंडियासमोर आव्हान
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून १८ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, उपांत्य फेरीत बलाढ्य न्यूझीलंडला ७० धावांनी पराभवाची धूळ चारून यजमान संघाने फायनलचे तिकिट मिळवले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला बाहेरचा रस्ता दाखवून ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद येथे फायनल खेळण्याचा मार्ग मोकळा केला. तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होत असून २० वर्षांचा बदला घेण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल.
Web Title: IND vs AUS Final Match Former India captain Sourav Ganguly said that it will be difficult to stop Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.