पांढऱ्या चेंडूने खेळण्याचा अनुभव घेतल्यानंतर भारतीय संघ ॲडिलेड येथे गुरुवारपासून पहिल्या कसोटीला सामोरा जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे याआधी भारताने साडेनऊ महिन्यांपूर्वी कसोटी खेळली होती, हे विशेष. भारताची दुर्दैवी बाजू अशी की कसोटी संघातील खेळाडू केवळ तीन महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतले. कसोटी तज्ज्ञ खेळाडू हवामानाशी एकरूप होण्यासाठी महिन्याभरापासून ऑस्ट्रेलियात आहेत.भारतीय संघ मागच्या मालिकेतील विजयापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल. ॲडिलेडमध्ये आव्हान असेल ते गुलाबी चेंडूने विद्युत प्रकाशझोतात खेळण्याचे. भारताला बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे एकमेव सामना खेळल्याचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलिया मात्र अशा वातावरणात अनेकदा खेळला. तरीही सध्याचा भारतीय संघ परिस्थितीशी जुळवून घेईल, असे माझे मत आहे. ऑस्ट्रेलियात तुमचा अनुभव आणि कौशल्य पुरेसे नसते. मानसिकदृष्ट्या किती सकारात्मक आहात, याला अधिक महत्त्व असते. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकाराशी किती लवकर एकरूप होता, यासाठी मानसिकरीत्या सक्षम होऊनच यजमान बलाढ्य संघाचे आव्हान परतवून लावता येईल. कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी फलंदाजी किंवा गोलंदाजीत भारत कशी सुरुवात करतो, यावर बरेच काही विसंबून असेल. या सामन्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. यामुळेच राहुलचा सहकारी म्हणून मयांक अग्रवाल याला खेळताना पाहणे मला आवडेल. राहुलला येथे सलामीला खेळण्याचा अनुभव आहेच. संघ व्यवस्थापनाची काय योजना असावी हे माहिती नाही मात्र राहुल- मयांक जोडी यजमान भेदक माऱ्याला संयमी आणि सावधपणे तोंड देऊ शकेल. सलामी जोडीबाबत बोलायचे तर ऑस्ट्रेलियाची वेगळी समस्या आहे. डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या या संघाकडे ज्यो बर्न्स आऊट ऑफ फॉर्म आहे. विल पुकोवस्की जखमी आहे. गत दोन वर्षांआधी भारतीय गोलंदाज प्रचंड फॉर्ममध्ये होते. यंदा ईशांतची अनुपस्थिती असली तरी जसप्रीत बुमराह, माेहम्मद शमी आणि उमेश यादव हे संघात आहेत. रवींद्र जडेजा फिट असल्यास एकमेव फिरकीपटू खेळविण्यास माझी पसंती असेल. एका टोकाहून मारा करीत तो दडपण आणू शकतो. एकंदरीत, मालिकेदरम्यान धडाकेबाज खेळ पहायला मिळण्याची शक्यता आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Ind vs Aus: कसोटी मालिकेत मानसिक सकारात्मकतेवर भर हवा- लक्ष्मण
Ind vs Aus: कसोटी मालिकेत मानसिक सकारात्मकतेवर भर हवा- लक्ष्मण
ॲडिलेडमध्ये आव्हान असेल ते गुलाबी चेंडूने विद्युत प्रकाशझोतात खेळण्याचे. भारताला बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे एकमेव सामना खेळल्याचा अनुभव आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 3:40 AM