ramiz raja on team india | नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली.
दरम्यान, रविवारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमानांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी रोहित शर्माच्या टीम इंडियाचे कौतुक केले. अरुण जेटली स्टेडियमवरील झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने 10 बळी घेऊन पॅट कमिन्स अँड कंपनीचा 6 गडी राखून पराभव केला. या शानदार विजयासह यजमान भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना रमीझ राजा यांनी दावा केला की कोणत्याही संघासाठी भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणे अशक्य आहे. "ऑस्ट्रेलियाचा डाव कसा सामना संपला, त्याचप्रमाणे कांगारूचा संघ पर्थ किंवा ब्रिस्बेनमध्ये आशियाई संघांविरुद्धचे सामने संपवायचा. पण आता सर्वकाही बदलले आहे. यावरून असे दिसून येते की ऑस्ट्रेलियन संघ तयार नाही, खासकरून जेव्हा भारतात चांगले कसोटी क्रिकेट खेळायचे असते. टीम इंडियाला भारतात हरवणे अशक्य आहे. फिरकीविरुद्ध कांगारूच्या संघाची सामान्य कामगिरी आहे. एका सत्रात नऊ गडी बाद झाले. जडेजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली", अशा शब्दांत राजा यांनी भारतीय संघाचे कौतुक केले.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"