मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तिसऱ्या कसोटी सामन्यात कोणाला संधी द्यायची, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळणार, यावरही चाहते आपले मत व्यक्त करत आहेत. पण जडेजा हा ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच जायबंदी होता, असा धक्कादायक खुलासा भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.
शास्त्री म्हणाले की, " ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच जडेजा जायबंदी होता. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. पण त्यानंतरही तो स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर जेव्हा तो ऑस्ट्रेलियामध्ये आला तेव्हा पुन्हा एकदा त्याचा खांदा दुखावला गेला. त्यानंतर त्याला एक इंजेक्शनही घ्यावे लागले. त्यामुळे सध्याच्या घडीला जडेजा अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही."
शास्त्री पुढे म्हणाले की, " जर आम्ही जडेजाला संघात घेतले आणि तो मधूनच दुखापतीमुळे सामना सोडून निघून गेला, तर आम्ही काय करायचे. आम्हाला फक्त ५-१० षटके टाकणारा गोलंदाज नको आहे. संघाला जर जिंकायचे असेल तर खेळाडू पूर्णपणे फिट असायला हवा, असे मला वाटते. "
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे. तीन दिवस विश्रांती केल्यानंतर आता भारताच्या संघाने सरावाचा श्रीगणेशा केला आहे.
Web Title: IND vs AUS: Before going to Australia, Jadeja was injured, Ravi Shastri's big disclosure
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.