ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सध्यातरी भारताचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघ या दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवेल, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. पण ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी मात्र 'माइंड गेम' खेळायला सुरुवात केली आहे. या दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीवर जास्त दडपण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोन्ही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू संघात नाहीत. त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी हा दौरा जास्त अवघड नसल्याचे म्हटले जाते आहे. भारताला आतापर्यंत एकदाही ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ यावेळी तरी मालिका जिंकेल, असे कयास लावले जात आहेत.
वॉ यांनी काही संदर्भ देत विराटवर का दडपण आहे हे दाखवून दिले आहे. ते म्हणाले की, " गेल्या दौऱ्यात भारताने ट्वेन्टी-२० मालिका जिंकली होती. त्यामुळे ते गतविजेते आहेत. त्यामुळे यावेळीही मालिका जिंकण्याचे दडपण कोहलीवर असेल. त्याचबरोबर आतापर्यंत भारताला ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वावर यावेळी बऱ्याच जणांना विजयाच्या आशा आहेत. त्यामुळे या दौऱ्यात सर्वाधिक दडपण हे कोहलीवर असेल."