नवी दिल्ली - भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज आणि मराठमोळ्या स्मृती मानधनाने कंगारुंच्या धरतीवर इतिहास रचला आहे. स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये गुलाबी चेंडूवर शतक ठोकले आहे. त्यासह, डे-नाईट क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूवर शतक बनवणारी पहिली महिला क्रिकेटर बनण्याचा बहुमानही स्मृतीला मिळाला आहे. 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या स्मृतीने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात आपलं शतक पूर्ण केलं.
भारतीय महिला संघ प्रथमच पिंक बॉल कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिलांनी हा इतिहास लिहिला आणि त्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं ऐतिहासिक कामगिरी केली. स्मृती आणि शेफाली वर्मा यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला आहे. स्मृती मानधनाच्या 80 धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर एक बाद 132 धावांची मजल मारली. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबण्यात आला तेव्हा मंधना ८० धावांवर, तर पूनम राऊत १६ धावांवर खेळत होत्या.
मानधनाने 170 चेंडूत 18 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने आपली धडाकेबाज शतकी खेळी पूर्ण केली. भारताकडून गुलाबी चेंडूवर शतक बनवणारी स्मृती मानधना ही पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे. दरम्यान, 15 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला क्रिकेट संघात हा कसोटी सामना होत आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ
ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची वन डे मालिका २-१ अशी जिंकली, परंतु टीम इंडियानं अखेरचा वन डे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाची सलग २६ वन डे विजयाची मालिका खंडीत केली. त्यामुळे आत्मविश्वासानं भरलेल्या भारतीय संघानं कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगला खेळ केला आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. १७ वर्षीय शेफाली आणि स्मृती यांनी ऑसी गोलंदाजांचा सामना करताना पहिल्या विकेटसाठी ९३ धावा जोडल्या. शेफाली ६४ चेंडूंत ४ चौकारांसह ३१ धावांवर माघारी परतली. आक्रमक फटकेबाजी मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शेफालीचा बचावात्मक खेळही सर्वांना भावाला.