IND vs AUS Test | नवी दिल्ली : भारतीय संघाने नागपूर येथील पहिला कसोटी सामना जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर कांगारूच्या संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खासकरून खेळपट्टीबाबत सामन्यापूर्वी जी चर्चा सुरू होती त्याचा परिणाम झाला आणि कांगारू संघाला दोन्ही डावात फारशा धावा करता आल्या नाहीत अशी चर्चा आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने एक मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, तो सामन्यापूर्वी खेळपट्टीकडे कधीच पाहत नव्हता, लाईन लेन्थवर लक्ष केंद्रित करून गोलंदाजी करायचा.
दरम्यान, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या मनात खेळपट्टीबाबत भीती होती. त्यासाठी त्यांनी विशेष तयारीही केली आणि भारताच्या रणजी गोलंदाजांना हाताशी घेऊन जोरदार सराव केला. मालिका सुरू होण्याआधीच खेळपट्टीबद्दल बरीच चर्चा रंगली होती, परंतु हे सर्व असूनही कांगारूचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि भारतीय संघाशी काहीच स्पर्धा करू शकला नाही.
मला खेळपट्टीची कधीच चिंता नव्हती - डेल स्टेनऑस्ट्रेलियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर डेल स्टेनने एक ट्विट करत म्हटले की, मी खेळपट्टीबद्दल कधीच इतका विचार केला नव्हता. "तुमचा विश्वास बसणार नाही पण जेव्हा मी खेळायचो तेव्हा मला सामन्यापूर्वी खेळपट्टी पाहणे कधीच आवडले नाही. जेव्हा माझी गोलंदाजी किंवा फलंदाजीची वेळ यायची तेव्हाच मी खेळपट्टी पाहायचो. मी माझ्या लाईन लेन्थवर लक्ष केंद्रित करून गोलंदाजी करायचो", अशा शब्दांत डेल स्टेनने कांगारूच्या संघाचे कान टोचले.
भारताचा मोठा विजय नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 177 धावांवर गारद झाला होता. त्याचवेळी भारतीय संघाने पहिल्या डावात 400 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाकडून 223 धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावातही कांगारू संघ अवघ्या 91 धावांत गारद झाला आणि त्यांना एका डावाच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"