भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दुसरा कसोटी सामना पर्थच्या मैदानात खेळवला जाणार आहे. पर्थच्या मैदानात भारताला आतापर्यंत फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. पर्थवर आतापर्यंत भारताने चार कसोटी सामने खेळले आहेत. चारपैकी तीन सामन्यांमध्ये भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पर्थच्या खेळपट्टीवर भारत विजय मिळवणार की ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी करणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे पहिला सामना १९७७ साली झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ या मैदानात थेट १९९२ साली उतरला होता. या सामन्यातली मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची खेळी अविस्मरणीय अशीच होती. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके जरी लगावली असली तरी सचिन हे शतक अजूनही विसरू शकलेला नाही. पण भारताला या सामन्यात तब्बल 3०० धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
पर्थच्या खेळपट्टीवर त्यानंतर भारतीय संघ उतरला २००८ साली. हा सामना भारतीय संघ कधीच विसरु शकणार नाही. कारण या सामन्यात भारताने पर्थवर पहिल्यांदा विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियापुढे ४१३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ३४० धावांवर सर्व बाद झाला होता. २०१२ साली भारतीय संघ पर्थवर अखेरचा सामना खेळला होता. त्यावेळी भारताला एक डाव आणि ४१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.