भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवत इतिहास रचला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये 1947 सालापासून दौरा करत आहे. आतापर्यंत भारताने 11 वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. पण यापूर्वी एकाही दौऱ्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे गेल्या 71 वर्षांमध्ये भारताने पहिल्यांदाच पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.
सोमवारी 4 बाद 104 वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर ट्रॅव्हीस हेडच्या रूपात पहिला धक्का बसला. त्यानंतर शॉन मार्श आणि टीम पेन यांनी सहाव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. दरम्यान, बुमराने शॉन मार्शची (60) विकेट काढत भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर चिवट फलंदाजी करत असलेल्या टीम पेनलाही (41) माघारी धाडत बुमाराने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र कांगारूंच्या शेपटाने चिवट झुंज दिल्याने भारताचा विजय लांबला. 121 चेंडूत 28 धावांची सावध खेळी करणाऱ्या पॅट कमिन्सने मिचेल स्टार्कच्या साथीने 41 आणि नाथन लायनच्या साथीने 31 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरीस बुमरानेच कमिन्सचा अडथळा दूर केला.
Web Title: IND vs AUS: India made history by winning the first match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.