नवी दिल्ली - वन डे विश्वचषकाआधी बीसीसीआयने भारताच्या विविध मालिकांची घोषणा करण्याचा धडाकाच लावला आहे. वेस्ट इंडीज दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर संघाची घोषणा झाली. आयर्लंड दौरादेखील जाहीर करण्यात आला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेची घोषणा केली आहे.
आशिया कपनंतर भारत जास्तीत जास्त वन डे सामने खेळणार आहे. आशिया कप १७ सप्टेंबरला संपणार असून, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये मीडिया राइट्सचा लिलाव संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळविली जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १४६ वन डे सामने झाले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने ८२ सामने जिंकले असून, भारताला फक्त ५४ सामनेच जिंकता आले आहेत. या दोन्ही संघांत शेवटची द्विपक्षीय मालिका ही मार्च २०२३ मध्ये झाली होती. ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ अशी जिंकली होती. भारताला आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी असेल.