भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दुसरा कसोटी सामना पर्थच्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. ही खेळपट्टी वेगवान असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी १३ सदस्यीय संघात पाच वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कसून सराव केला असून पर्थच्या खेळपट्टीसाठी भारतीय तोफखाना सज्ज झाला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये 1947 सालापासून दौरा करत आहे. आतापर्यंत भारताने 11 वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. पण यापूर्वी एकाही दौऱ्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे गेल्या 71 वर्षांमध्ये भारताने पहिल्यांदाच पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता.
पहिल्या सामन्यासाठी संघात मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा या तीन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली होती. पण दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात पाच वेगवान गोलंदाजांनिशी उतरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.