अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फक्त त्यांच्या संघाबरोबरच दोन हात करायचे नाहीत, तर त्यांना तिथल्या स्थानिक मीडियालाही सामोरे जावे लागते आहे. ऑस्ट्रेलियाच्या मीडिया नेहमीच पाहुण्या संघावर टीका करत आली आहे. भारतीय संघ घाबरट वटवाघुळासारखा आहे, अशी काडी आता ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने टाकली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये एका वर्तमानपत्रामध्ये एक फोटो छापण्यात आला आहे. या फोटोमध्ये भारताचे रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार हे दोन खेळाडू आहेत. हा फोटो छापताना त्यावर ठळक अक्षरांमध्ये ' दी स्केर्डी बॅट्स' म्हणजेच घाबरट वघवाघुळ असे म्हटले गेले आहे. अॅडलेड येथे भारताचा पहिला कसोटी सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ घाबरट वघवाघुळासारखा असेल, असे सुचवण्यात आले आहे.
या मैदानात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात यावा, अशी विनंती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला केली होती. पण बीसीसीआयने ही विनंती मान्य केली नाही. त्यामुळे भारतीय संघ हा अंधाराला घाबरतो, असा या साऱ्या प्रकरणाचा गर्भित अर्थ आहे, असेही म्हटले जात आहे.