aus vs ind test series : भारतीय संघाला मोठ्या कालावधीनंतर आपल्या मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली. भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने यजमानांचा ३-० ने दारुण पराभव केला. बंगळुरू, पुणे आणि मग मुंबईत झालेल्या अखेरच्या सामन्यातही भारतीय खेळाडू सपशेल अपयशी ठरले. या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला मोठा संघर्ष करावा लागेल. आगामी काळात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळेल. यातील चार सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे.
टीम इंडियाचा खडतर प्रवास सुरू असताना माजी खेळाडू शिखर धवनने खेळाडूंचे मनोबल वाढवताना त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. सलामीचा सामना पर्थ येथे २२ तारखेपासून खेळवला जाईल. मागील दोन मालिकांमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला चीतपट केले. २०१८-१९ मध्ये विराट कोहली तर २०२०-२१ मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील संघाने कांगारुंना पराभवाची धूळ चारली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताच्या पदरी पडलेली निराशा हे पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारत विजयाची हॅटट्रिक साकारेल का? असे विचारले असता धवनने भारतीय खेळाडूंची पाठराखण करत त्यांना शुभेच्छा दिल्या. "मला वाटते की, सलग तिसऱ्यांदा मालिका जिंकून हॅटट्रिक मारण्याची संधी आपल्याला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील दोन मालिकांमध्ये टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे भारत एका विजयाच्या मानसिकतेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल अशी मला खात्री आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहनेदेखील कांगारुंच्या धरतीवर चांगली कामगिरी केली आहे. या खेळाडूंचा अनुभव युवा खेळाडूंना मदत करेल. भारतीय संघातील युवा शिलेदारांमध्ये खूप आत्मविश्वास आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ला कसे चांगले करता येईल त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. ही टीम इंडियाची जमेची बाजू आहे. आव्हान मोठे असले तरी भारत यात विजयी होईल असे वाटते", असे धवनने नमूद केले. टीम इंडियाचा 'गब्बर' 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलत होता.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर