India vs Australia T20I, KL Rahul Press Conference : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका विरुद्धची ट्वेंटी-२० मालिका हा भारतीय संघासाठी अभ्यास असणार आहे. मंगळवारी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० होणार आहे. त्याआधी भारतीय संघाचा उप कर्णधार लोकेश राहुल याने पत्रकार परिषद घेतली. लोकेश राहुलचा फॉर्म हा फार काही चांगला नाही आणि त्यामुळे त्याच्या निवडीवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यात कर्णधार रोहित शर्मा याने रविवारी लोकेश राहुल हा संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असल्याचे जाहीर करून टीकाकारांची तोंडं बंद केली. पण, आज त्याच लोकेशच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जानेवारी २०२१पासून लोकेशचा स्ट्राईक रेट १२७.९६ इतका आहे. त्याच्या या कमी स्ट्राईक रेटवरून बरीच चर्चा सुरू आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत लोकेश व रोहित ही जोडी सलामीला येणार आहे. लोकेश म्हणाला,'' कुणीच परफेक्ट नसतं.. ड्रेसिंग रुममध्येही कुणीच परफेक्ट नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर काम करतंय, प्रत्येकाकडे एक जबाबदारी सोपवली आहे आणि त्यासाठी सर्व मेहनत घेत आहेत. स्ट्राईक रेटवर तुमचं मुल्यमापन होतं, पण हा एकच निकष नसतो. हो पण, मी त्यावर काम करतोय.'' दुखापतीतून कमबॅक केल्यानंतरही लोकेशला फॉर्म गवसलेला नाही. भारतीय सलामीवीर लोकेशनेही हे मान्य केलं आणि दुखापतीतून पुनरागमन करताना काही सामन्यानंतर आत्मविश्वास कमावला असेही तो म्हणाला.''दुखापतीतून पुनरागमन करताना आत्मविश्वास मिळवण्यासाठी मला काही सामने लागले. त्यावेळी खेळपट्टीवर टीकून राहणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळेच आशिया चषक आणि झिम्बाब्वे दौरा माझ्यासाठी महत्त्वाचा होता. आता मला चांगलं वाटतंय.. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज आहे.''असेही लोकेश म्हणाला. भारतीय संघ -रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाचा संघ - सीन एबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, आरोन फिंच, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.
वेळापत्रक
पहिली ट्वेंटी-२०- २० सप्टेंबर- मोहाली, सायंकाळी ७.३० वा.पासूनदुसरी ट्वेंटी-२० - २३ सप्टेंबर- नागपूर, सायंकाळी ७.३० वा.पासूनतिसरी ट्वेंटी-२० - २५ सप्टेंबर- हैदराबाद, सायंकाळी ७.३० वा.पासून