IND vs AUS Test | नवी दिल्ली : भारतीय संघाने नागपूर येथील पहिला कसोटी सामना जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर या सामन्यात देखील संघाचा उपकर्णधार लोकेश राहुलची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताच्या पहिल्या डावात राहुलने 71 चेंडू खेळले आणि केवळ 20 धावा करून तो बाद झाला. राहुलच्या बॅटमधून फक्त 1 चौकार निघाल्याने आता माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद त्याच्यावर भडकला आहे. व्यंकटेश प्रसाद याने एकापाठोपाठ एक नाही तर पाच ट्विट करत राहुलवर जोरदार निशाणा साधला आहे. मात्र, भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनिल गावस्कर यांनी लोकेश राहुलचे समर्थन केले आहे.
गावस्करांनी केलं राहुलचं समर्थन सुनिल गावस्करांनी लोकेश राहुलला आणखी एक संधी द्यायला हवी असे म्हटले आहे. "माझ्या मते मागील 1-2 वर्षात त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते त्याला आणखी एक संधी द्यायला हवी. मला खात्री आहे की त्याला दिल्ली कसोटी सामन्यासाठी खेळवायला हवे. त्यानंतर तुम्ही त्याचा विचार करू शकता कारण तुमच्याकडे फॉर्ममध्ये असलेला फलंदाज शुबमन गिल त्याची जागा घेण्यास तयार आहे", असे गावस्करांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटले.
व्यंकटेश प्रसादने केली होती टीका व्यंकटेश प्रसादने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "'मला लोकेश राहुलच्या प्रतिभा आणि क्षमतेबद्दल खूप आदर आहे, परंतु दुर्दैवाने त्याची कामगिरी खूपच ढासळत चालली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 8 वर्षांनंतर 46 कसोटी सामन्यांनंतर 34ची सरासरी अतिशय सामान्य आहे. खूप लोकांचा असा विचार करू शकत नाही कारण त्यांना अनेकांना एवढ्या संधी मिळाल्या नाहीत."
सरफराज किंवी शुबमन गिलला संधी द्यावी - प्रसाद लोकेश राहुलऐवजी शुबमन गिल किंवा सरफराज खान यांना कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळायला हवी, जे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि सातत्याने धावा करत आहेत, असे व्यंकटेश प्रसादचे मत आहे. "आमच्याकडे चांगल्या फॉर्ममध्ये असलेले अनेक खेळाडू आहेत, जे संधीची वाट पाहत आहेत. शुबमन गिल चमकदार फॉर्ममध्ये आहे, सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतके झळकावत आहे आणि राहुलच्या जागी संधी दिली जाऊ शकते असे अनेक आहेत. काही खेळाडू नशीबवान असतात, त्यांना यश मिळेपर्यंत अनेक संधी दिल्या जातात तर काही प्रतिक्षेतच राहतात", अशा शब्दांत व्यंकटेश प्रसादने लोकेश राहुलच्या खेळीचा समाचार घेतला.
उपकर्णधारपदावरून हकालपट्टी करावी लोकेश राहुलने कसोटी संघाचा उपकर्णधार होऊ नये, असा सल्ला व्यंकटेश प्रसादने दिला आहे. भारतीय संघाला हवे असेल तर इतर अनेक खेळाडू आहेत, ज्यांना उपकर्णधार बनवता येईल. माजी क्रिकेटपटूने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "लोकेश राहुलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अश्विन हा चांगला क्रिकेट खेळणारा चेहरा आहे, तो कसोटी संघाचा उपकर्णधार असावा. तो नसेल तर पुजारा किंवा जडेजाला उपकर्णधार बनवले जाऊ शकते. लोकेश राहुलपेक्षा मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांचा कसोटी क्रिकेटमध्ये चांगला प्रभाव पडला आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"