नागपूर-
राज्यात सध्या शिंदे गटाविरोधात '५० खोके एकदम ओक्के' ही घोषणा विरोधकांकडून दिली जात आहे. महाविकास आघाडीकडून शिंदे गटावर टीका करताना विधानसभेच्या पायऱ्यांवर आपण शिंदे गटाविरोधात '५० खोके एकदम ओके'चे बॅनर आपण पाहिले आहेत. पण आता या घोषणेचं लोण थेट क्रिकेटच्या मैदानात पोहोचलं आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा ट्वेन्टी-२० सामना नागपूरच्या VCA मैदानावर खेळवण्यात आला. यात काही प्रेक्षकांनी '५० खोके एकदम ओक्के'चा बॅनर झळकावला. बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. कॅमेरानं हा बॅनर टिपताच स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडूनही '५० खोके एकदम ओक्के'च्या घोषणा दिल्या गेल्या. सोशल मीडियावर हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
शिवसेनेतून ४० आमदार बाहेर पडून शिंदे यांना सामील झाल्यानंतर विरोधकांकडून फुटीर आमदारांनी ५० खोके घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केला गेला. याच विरोधात '५० खोके एकदम ओक्के'च्या घोषणा शिंदे गटाविरोधात दिल्या जाऊ लागल्या. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी याच घोषणांनी शिंदे गटातील आमदारांना जेरीस आणलं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्यभर केलेल्या दौऱ्यातही याच घोषणांवर भर दिला गेला. शिंदे गटातील आमदारांच्याही ही घोषणा जिव्हारी लागल्याचं दिसून आलं होतं आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. सोशल मीडियातही '५० खोके एकदम ओक्के' घोषणा प्रचंड व्हायरल झाली आणि याचीच प्रचिती क्रिकेटच्या मैदानातही पाहायला मिळाली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी नागपूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने ६ गडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सुरुवातीला सामन्यावर अनिश्चिततेचे ढग होते. अखेर सामना ८ षटकांचा खेळवण्यात आला. यात भारतानं बाजी मारली आणि मालिकेत १-१ नं बरोबरी केली. ऑस्ट्रेलियानं दिलेलं ९१ धावांचं आव्हान भारतानं ६ गडी राखून गाठलं. यात भारताकडून रोहित शर्मानं कर्णधारी खेळी साकारत २० चेंडूत नाबाद ४६ धावांची खेळी साकारली. यात ४ षटकार आणि ४ खणखणीत चौकारांचा समावेश होता. तर दिनेश कार्तिकनं दोन चेंडूत १० धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.