नवी दिल्ली : ॲडिलेड कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात ३६ धावांत गारद झाल्यानंतर झालेल्या लाजिरवाण्या पराभवाचा धक्का एवढा जोरदार होता की, संघाचे रणनीतीकारांना रात्रभर झोप लागली नाही, पण महत्त्वाची बाब म्हणजे मेलबोर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची रणनीती त्याच रात्री १२.३० वाजता तयार झाली, असा खुलासा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी केला. श्रीधर म्हणाले,‘रात्री १२.३० वाजता विराटचा संदेश आला की तुम्ही कसे आहात? मला धक्का बसला.
विराट विचारत होता की, मी त्या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतो ज्यात रवी शास्त्री (मुख्य प्रशिक्षक), भरत अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि विक्रम राठोड (फलंदाजी प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसोबत श्रीधर यांची ही चर्चा आहे. श्रीधर म्हणतात, ‘मी विराटला म्हटले की तूसुद्धा ये. विराट आमच्यासोबत जुळला आणि येथेच मेलबोर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची रणनीती तयार होऊ लागली.’ श्रीधर-शास्त्री यांनी बैठकीत एका बाबीवर लक्ष वेधले की ‘३६’ला बॅचप्रमाणे ठेवा. या ३६ धावा अशी बाब आहे की, जी संघाला शानदार करेल.
श्रीधर म्हणाला, मेलबोर्न कसोटीमध्ये संघाच्या संयोजनाबाबत काही साशंकता होती, पण कोहलीच होता ज्याने गोलंदाजी मजबूत करण्यास सांगितले. त्याने सकाळी रहाणेला फोन केला आणि सांगितले की, आमची चर्चा चांगली झाली. विराटला पितृत्व रजेसाठी मायदेशी रवाना व्हायचे होते. कोहलीच्या स्थानी रवींद्र जडेजाला संघात सामील करण्याचा निर्णय त्याच बैठकीत घेण्यात आला, पण महत्त्वाची बाब म्हणजे कमी धावसंख्येत बाद झाल्यानंतर संघ आपली फलंदाजी मजबूत करतो, पण रवी शास्त्री, कोहली आणि रहाणे यांनी गोलंदाजी मजबूत करण्याचा निर्णय घेतला.
तीन कसोटी सामन्यांची मालिका मानली : जडेजापहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवातून सावरणे केवळ सकारात्मकतेमुळे शक्य झाले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रूममधील माहोलची चर्चा एका मुलाखतीमध्ये केली आहे. जडेजा म्हणाला,‘पुनरागमन करणे तेसुद्धा ऑस्ट्रेलियासारख्या भेदक माऱ्याविरुद्ध खरेच कठीण होते. त्यावेळी आम्ही विचार केला की, पहिला कसोटी सामना विसरून ही मालिका तीन सामन्यांची आहे असे समजू. आम्ही एकमेकांचे मनोधैर्य उंचावले. सर्वकाही सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला. मी स्वत: फलंदाजीचा सराव केला आणि फलंदाजीमध्ये जास्तीत जास्त योगदान देण्याचा निश्चिय केला.’