सिडनी : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे अनुभवी खेळाडू नाहीत. त्यामुळे भारताला यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे, असे म्हटले जात आहे. हिच भीती ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनलाही वाटत आहे आणि त्यामुळे स्मिथ व वॉर्नर यांच्यावरील बंदी उठवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पण, स्मिथ आणि वॉर्नर यांच्या बंदी उठवण्याच्या प्रयत्नांना ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गज गोलंदाजाने विरोध केला आहे.
स्मिथ, वॉर्नर आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडू कुरतडल्याप्रकरणी घालण्यात आलेली बंदी कायम राखावी अशी मागणी माजी जलदगती गोलंदाज मिचल जॉन्सनने केली आहे. या तिघांनीही बंदी विरोधात कोणतिही याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे ती कायम राहावी, असे जॉन्सनचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलिया संघाची सध्याची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. अशा स्थितीत संघात स्मिथ व वॉर्नरचे पुनरागमन होणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला महत्त्वाचे वाटत आहे.
जॉन्सनने ट्विट केले की,''तिन्ही खेळाडूंनी बंदीचा निर्णय स्वीकारला आहे. त्यांनी त्याविरोधात दाद मागितलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील बंदी कायम राहावी, असे मला वाटते.''