अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांनी दमदार खेळी साकारत भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला. सध्याच्या घडीला विराट चांगल्या फॉर्मात आहे. एकामागून एक विक्रम ते रचत आहेत. पण या सामन्यात मात्र धोनीने कोहलीला मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 299 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा सामना करताना कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 39वे शतक झळकावले. कोहलीने 112 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 104 धावा केल्या. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.
धावांचा पाठलाग करताना धोनी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. या गोष्टीमध्ये त्याने कोहलीलाही मागे टाकले आहे. धोनीने 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना 99.85च्या सरासरीने 2696 धावा केल्या आहेत. कोहलीने 77 एकदिवसीय सामन्यांमध्ये 99.04च्या सरासरीने 4853 धावा केल्या आहेत.