अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावत विजयाचा पाया रचला. या पायावर कळस चढवला तो महेंद्रसिंग धोनीने. पण दुसऱ्या सामन्यानंतर जेवढी विराटच्या शतकाची चर्चा नाही, तेवढी मॅच फिनिशर म्हणून धोनीची स्तुती होताना दिसते आहे. दस्तुरखुद्द कोहलीनेही या सामन्यानंतर धोनीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा सामना करताना कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 39वे शतक झळकावले. कोहलीने 112 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 104 धावा केल्या. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, " धोनीच्या डोक्यामध्ये नेमके काय सुरु असते ते कुणालाही कळू शकत नाही. परिस्थितीचा तो उत्तम अंदाज घेतो. मोठे फटके मारण्यापूर्वी तो स्थिरस्थावर होतो. धोनी नेहमीच शांत असतो आणि प्रत्येकाला मदत करत असतो. पण आजचा धोनी काहीसा वेगळाच होता, तो आपल्याच विश्वात रमला होता."