अॅडलेड : ‘नेट सराव सोडा, खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर दिली. शास्त्री म्हणाले, ‘आम्ही इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना ३१ धावांनी गमावला होता, दक्षिण आफ्रिकेत पहिल्या लढतीत ६०-७० धावांनी पराभूत झालो होतो. खेळाडूंनी येथे पहिल्या लढतीत विजय मिळवल्यामुळे आनंद झाला. चांगली सुरुवात झाल्यानंतर आत्मविश्वास उंचावतो.’
दुसरा कसोटी सामना १४ डिसेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार असून त्यात वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील, असा शास्त्री यांना विश्वास आहे. त्यांनी या लढतीपूर्वी नेट्समध्ये सराव न करण्याचे संकेत दिले आहेत. शास्त्री म्हणाले,‘खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे नेट्स सरावाला गोळी मारा. तुम्ही केवळ येथे या, आपला शानदार खेळ केला आणि त्यानंतर हॉटेलमध्ये परत जा. पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असून तेथे वेगवान गोलंदाज वर्चस्व गाजवतील, याची आम्हाला कल्पना आहे.’ शास्त्री पुढे म्हणाले, ‘गोलंदाजांनी पहिल्या डावात शानदार कामगिरी केली. आम्ही २५० धावा केल्या होत्या आणि गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. हे केवळ एका रात्रीत शक्य झाले नाही. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केल्यानंतरच यश मिळवता येते.’
Web Title: IND vs AUS: Net Shawar hit shot, players need rest - Ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.