सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : संघटनेपेक्षा कुणीही मोठे नसते. पण सध्याच्या घडीला संघटना झुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही संघटना म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत असेलली बीसीसीआय. आणि बीसीसीआय ज्याच्यापुढे झुकण्याची शक्यता आहे तो म्हणजे युवा यष्टीरक्षक रिषभ पंत.
सिडनी कसोटी सामन्यात पंतने दमदार खेळी साकारली. त्याने साकारलेल्या नाबाद 159 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला 622 धावांचा डोंगर उभारता आला होता. या खेळीमुळे त्याचे भारतीय कसोटी संघातील स्थान निश्चित समजले जात आहे. कारण भारतापुढे पंतसारखा दुसरा पर्यायही दिसत नाही.
पंत जर भारताच्या कसोटी संघात कायम राहीला तर त्याला बीसीसीआयला आपल्या करारश्रेणीमध्ये सामावून घेऊ शकते. बीसीसीआयच्या करारामध्ये A+, A, B आणि C अशा विविध श्रेणी आहेत. जे खेळाडू अतिमहत्वाचे आहेत किंवा जे सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळतात त्यांना सर्वोच्च श्रेणी देण्यात येते. त्याचबरोबर जे फक्त कसोटी क्रिकेट खेळतात त्यांनाही पहिल्या दोन श्रेणींमध्ये स्थान दिले जाऊ शकते.
बीसीसीआयने 2017-18 साली पंतबरोबरही करार केला होता. पण त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याबरोबरचा करार रद्द केला होता. सध्याच्या घडीला पंत बीसीसीआयच्या कोणत्याही करारश्रेणींमध्ये नाही. पण आता जर पंत कसोटी संघात खेळत असेल तर त्याला आगामी वर्षासाठी करारश्रेणींमध्ये स्थान द्यावे लागणार आहे. त्यामुळे एकेकाळी ज्या बीसीसीआयने पंतला नाकारले होते, आता त्यांनाच त्याला करारश्रेणींमध्ये स्थान द्यावे लागणार आहे.