सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतही दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाने मालिकेच्या तयारीसाठी बुधवारी नेटमध्ये कसून सरावही केला. तेच दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलियाच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभवातून ऑस्ट्रेलियाचा संघ सावरण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु पहिल्या वन डे सामन्यापूर्वीच त्यांचा धक्का बसला आहे. मिचेल मार्श गेल्या दोन दिवसांपासून जठराच्या समस्येमुळे रुग्णालयात असल्यामुळे तो पहिल्या वन डे सामन्यात खेळू शकणार नाही.
ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मार्शच्या जागी बदली खेळाडू म्हणून पर्थ स्कॉचर्स संघाच्या अॅश्टन टर्नर याचा समावेश करण्यात आला आहे. मार्श पहिल्या सामन्याला मुकणार असला तरी तो अॅडलेड ( 15 जानेवारी) आणि मेलबर्न ( 18 जानेवारी) वन डे सामन्यासाठी तो उपलब्ध होईल अशी माहितीही लँगर यांनी दिली. त्याच्याजागी संघात स्थान पटकावणारा टर्नर हा शनिवारी वन डे पदार्पण करू शकतो. टर्नर हा मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो.
वन डे मालिकेसाठीचे संघऑस्ट्रेलिया : अॅरोन फिंच ( कर्णधार ) , जेसन बेहरेंडोर्फ, अॅलेक्स करी, पीटर हँड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जे रिचर्डसन, पीटर सिडल, बिली स्टॅनलेक, मार्कस स्टोइनिस, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा, मिचेल मार्श.
भारत : विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.