मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाने आपला मोर्चा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे वळवला आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे पाच वन डे व तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी संघात एक बदल केला. कसोटी मालिका गाजवणाऱ्या जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने केला. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला वन डे आणि सिद्धार्थ कौलला ट्वेंटी-20 संघात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयचा हा निर्णय नेटिझन्सच्या पचनी पडलेला नाही. त्यांनी त्वरित बीसीसीआयवर टीका सुरु केली.
भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केले. या मालिकेत बुमराने सर्वाधिक 21 विकेट घेतल्या आहेत. मे महिन्यापासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत होते. मात्र, ही विश्रांती गोलंदाजांना आयपीएलदरम्यान मिळणार होती आणि त्यामुळेच बीसीसीआयचा हा निर्णय आयपीएल मालकांच्या दबावातून घेतल्याची चर्चा नेटिझन्सनी सुरु केली आहे.