IND vs AUS odi live : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या सन्मानजनक आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच तीन मोठे धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर खाते न उघडता तंबूत परतले. त्यामुळे डाव सावरण्याची जबाबदारी आता लोकेश राहुल आणि विराट कोहलीच्या खांद्यावर आहे. किंग कोहलीचा एक झेल सोडून ऑस्ट्रेलियाने भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर माजी खेळाडू युवराज सिंगने टीम इंडियाचे कान टोचले. तसेच विराटचा झेल सोडल्याने ऑस्ट्रेलियाला मोठी किंमत मोजावी लागू शकते, असा इशारा देखील दिला.
तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत सर्वबाद १९९ धावा केल्या. रवींद्र जडेजाने कांगारूंना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अत्यंत खराब सुरूवात झाली. आघाडीचे तिन्ही फलंदाज एकही धाव न काढता तंबूत परतले. श्रेयस अय्यरला साजेशी देखील खेळी करता न आल्याने युवीने त्याच्यावर निशाणा साधला.
सोशल मीडियावर एक पोस्ट करत युवराज सिंगने म्हटले, "चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाला दबाव आत्मसात करावा लागतो. त्यामुळे श्रेयस अय्यरकडून आणखी चांगला विचार हवा होता, जेव्हा संघ डाव उभारण्याचा प्रयत्न करत असतो. मला अजूनही समजले नाही की, लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर का फलंदाजी करत नाही. पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावल्यानंतर देखील असे का. विराट कोहलीचा झेल सोडत आहेत, याची ऑस्ट्रेलियाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्याचा झेल सोडू नका कारण तो सामना फिरवू शकतो."
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.