IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. चार सामन्यांची कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश पक्का केला. आता आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईत होणार आहे, पण रोहित शर्मा ( Rohit sharma) त्यात खेळणार नाही. टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या वन डे सामन्यातून बाहेर असल्याची बातमी आधीच प्रसिद्ध होती. पण, तो का खेळणार नाही याचे कारण आता समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी त्याच्या जागी हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत कर्णधारपद भूषवणार आहे. मात्र, त्यावेळी या निर्णयामागील कारण सांगण्यात आले नव्हते. सोशल मीडियावर रोहित शर्मा पहिल्या वन डे सामन्यात न खेळण्यामागे मेहुण्याचं लग्न हे कारण असल्याचे समोर येत आहे. रोहितने अलीकडेच श्रेयस अय्यरसोबत शार्दूल ठाकूरच्या लग्नात हजेरी लावली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका १७ मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाचा भाऊ कुणाल सजदेह याचं लग्न असल्याने रोहित पहिल्या वन डेसाठी उपलब्ध नसणार आहे.
भारताचा वन डे संघ - India’s ODI squad vs Australia - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"