IND vs AUS ODI Series : भारताच्या अंडर-१९ संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या अंडर-१९ संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सात धावांनी पराभव करत विजयाची नोंद केली. यासह भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत कांगारूंना क्लीन स्वीप करून ३० वर्ष जुना विक्रम मोडला. भारताने पहिला सामना ७ गडी राखून आणि दुसरा सामना ९ गडी राखून मोठ्या फरकाने जिंकला होता. अखेरच्या वन डे सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ३२४ धावा केल्या होत्या, परंतु लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला निर्धारित ५० षटकांत केवळ ३१७ धावा करता आल्याने टीम इंडियाने शेवटचा सामना देखील आपल्या नावावर केला.
दरम्यान, टीम इंडियाकडून रुद्र पटेलने सर्वाधिक ७७ धावा केल्या, तर कर्णधार मोहम्मद अमानने ७१ धावांचे योगदान दिले. याशिवाय अखेरीस हार्दिक राजने १८ चेंडूत ३० धावांची आणि चेतन शतमाने ९ चेंडूत १८ धावांची साजेशी खेळी खेळून टीम इंडियाची धावसंख्या ३०० पार नेली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन कर्णधार ऑलिव्हर पीकने १११ धावांची शतकी खेळी केली. त्याने स्टीव्हन होगनसोबत १८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी नोंदवली. होगनने १०४ धावा केल्या. मात्र ऑलिव्हर आणि होगन यांची शतकी खेळीही ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही.
टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी खरे तर आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-१९ स्तरावरील वन डे सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या १९९४ मध्ये झाली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला होता आणि वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला केवळ २७१ धावा करता आल्या होत्या.