सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ वन डे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला दणका देण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने दोन्ही मालिकेतील आठही सामने जिंकल्यास त्यांना आयसीसीच्या वन डे क्रमवारीत अव्वल स्थानाजवळ पोहोचता येऊ शकेल. सध्या इंग्लंड 126 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि आठही सामने जिंकल्यास भारताची गुणसंख्या 125 होईल.
दरम्यान, मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, केदार जाधव आणि अन्य सहकारी भारताच्या वन डे संघात सहभागी झाले आहेत. धोनीने गुरुवारी नेट्समध्ये कसून सरावही केला. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्यादृष्टीने पुढील वन डे मालिका धोनीसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्याशिवाय कार्तिक, पांड्या आणि जाधव यांच्यावरही निवड समितीचे लक्ष असणार आहे.
यजमान ऑस्ट्रेलियाच्या बाबतित बोलायचे झाल्यास अॅरोन फिंचला कसोटी मालिकेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि वन डे संघाचे तो नेतृत्व सांभाळणार आहे. ग्लेन मॅक्सवेलही वन डे संघात कमबॅक करत आहे. मात्र, मिचेल मार्शला दुखापतीमुळे पहिल्या वन डेतून माघार घ्यावी लागली आहे. कसोटी मालिकेत 21 विकेट घेणाऱ्या नॅथन लियॉनलाही वन डे संघात स्थान देण्यात आले आहे. आयसीसी वन डे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 100 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
वन डे मालिकेसाठीचे संघ
ऑस्ट्रेलिया : अॅरोन फिंच ( कर्णधार ) , जेसन बेहरेंडोर्फ, अॅलेक्स करी, पीटर हँड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जे रिचर्डसन, पीटर सिडल, बिली स्टॅनलेक, मार्कस स्टोइनिस, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा, मिचेल मार्श.
भारत : विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.