भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा विराट कोहली हा सध्याचा घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार असल्याचे म्हटले जात आहे. पण त्याच्या या संस्थानाला आव्हान देण्यासाठी एक खेळाडू सज्ज झाला आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये 1947 सालापासून दौरा करत आहे. आतापर्यंत भारताने 11 वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. पण यापूर्वी एकाही दौऱ्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे गेल्या 71 वर्षांमध्ये भारताने पहिल्यांदाच पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्याबरोबरच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली एकाच वर्षात भारतीय संघाला या तिन्ही देशांमध्ये विजय मिळाले आहेत.
कोहलीचा दबदबा असताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही ऐतिहासिक विजय मिळवत असल्याचे दिसत आहे. गेल्या ४९ वर्षांमध्ये न्यूझीलंडला आपल्या देशाबाहेर पाकिस्तानला एकदाही मालिका जिंकता आली नव्हती. पण विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्याचबरोबर आयसीसीच्या क्रमवारीत विल्यमसनने 913 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडकडून 900 गुण पटकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीच्या खात्यात सध्या 920 गुण असून तो क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे कोहलीला सध्या सर्वात मोठा धोका विल्यमसनकडून असल्याचे म्हटले जात आहे.